ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. २० - मिरजेतून एकाचवेळी 50 टँकरमधून 25 लाख लिटर पाणी घेऊन निघालेली ‘जलदूत’ एक्स्प्रेस बुधवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाली आहे. ही जलदूत एक्स्प्रेस मंगळवारी रात्री रवाना झाली होती. प्रशासनाचे अथक प्रयत्न मार्गी लागल्याने ही रेल्वे आता पूर्णक्षमतेने पाणी घेऊन जाणार आहे. मिरज येथील रेल्वे यार्डात टँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येणार आहे.
मिरज रेल्वे स्थानकातून मंगळवारी सकाळी पाच लाख लिटर पाणी घेऊन दहा टँकरची नववी खेप लातूरला पाठविण्यात आली. रेल्वे यार्डात एकाचवेळी 25 लाख लिटर पाणी भरण्याची सोय झाल्याने आता दररोज 50 टँकर लातूरला जाणार आहेत. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला ‘जलदूत’ हे नाव देण्यात आले असून ‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जलदूत कोणत्याही स्थानकावर क्रॉसिंगला न थांबता लातूरला रवाना होईल. मिरजेतून लातूरपर्यंत जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात. मात्र जलदूत एक्स्प्रेस सात तासात लातूरला पोहोचणार आहे.
पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे जलशुद्धिकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनी व उच्च क्षमतेच्या मोटारी बसविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यंत्रणेद्वारे रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत नदीच्या पाण्याचा साठा करून ते पाणी रेल्वे टँकरमध्ये भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. गेले नऊ दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येत होते. आता उच्च दाबाने टँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने व 50 टँकरच्या दोन रेल्वे उपलब्ध झाल्यामुळे लातूरकरांना दररोज २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे.