ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ : शासनाच्या विरोधातील संताप, स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नंबर वन पक्ष व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी स्वबळावर तर अन्य ठिकाणी आघाडी करण्यावर पक्षाचा भर राहणार आहे.
पाच नगरपालिकांमध्ये सत्ताधारीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या पारोळा, चाळीसगाव, फैजपूर, सावदा व भुसावळ नगरपालिकेत सत्ताधारी पक्ष आहे. धरणगाव नगरपालिकेची सत्ता एका मताने तर चोपड्याची सत्ता चिठ्ठीमुळे राष्ट्रवादीच्या हातातून गेली होती. १३ नगरपालिकांपैकी सात नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत नंबर वन पक्ष रहावा यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहे.आजी-माजी आमदारांवर जबाबदारीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १३ नगरपालिकांची जबाबदारी ही आजी-माजी आमदारांवर सोपविली आहे. पारोळा व एरंडोलची जबाबदारी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतीश पाटील,धरणगावची माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, चाळीसगावसाठी माजी आमदार राजीव देशमुख, पाचोऱ्याची जबाबदारी दिलीप वाघ, चोपड्याची माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, रावेर, यावल, सावदा, फैजपूरची जबाबदारी माजी आमदार अरुण पाटील, बोदवडची जबाबदारी अॅड.रवींद्र पाटील, भुसावळची जबाबदारी विजय चौधरी व उमेश नेमाडे यांच्याकडे तर अमळनेरची जबाबदारी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यावर सोपविली आहे.महागाई, शेतमालाचे भाव प्रचाराचे मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरपालिका निवडणुकीत राज्य व केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर महागाईमधील वाढ, शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेले कवडीमोल भाव तसेच मराठा आरक्षण हे विषय प्रचारासाठी घेण्यात येणार आहे. यासोबतच नगरपालिकास्तरावरील स्थानिक प्रश्न प्रचारात घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी प्रबळ आहे, तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी समविचारी पक्षासोबत आघाडी होईल. माजी आमदारांवर जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष नंबर वन राहिल असा विश्वास आहे. डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.