ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५०१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केले. त्यामुळे जिल्हा दुष्काळमुक्त झाल्याचे या पैसेवारीने शिक्कामोर्तब झाले आहे. २०१६-१७ ची सुधारीत पैसेवारी जिल्हा प्रशासनाने २९ आॅक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. त्यात जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत आलेली नाही.
सर्व गावे ५० पैशांच्यावर आहे. म्हणजे जिल्ह्यात चांगला हंगाम असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील मंडळातील पीक कापणी अहवाल कसा आहे, याची माहिती घेण्यात आली. हा अहवाल तहसीलदारांना सादर केल्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी व कृषी अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली. त्यानंतर एकत्रित अहवाल तयार करण्यात आला.
यात जळगाव : ९२, जामनेर १५२, एरंडोल : ६५, धरणगाव : ८९, भुसावळ : ५४, यावल : ८४, रावेर : १२१, मुक्ताईनगर : ८१, बोदवड : ५१, पाचोरा : १२८, चाळीसगाव: १३६, भडगाव : ६३, अमळनेर : १५४, पारोळा : ११४, चोपडा तालुक्यातील ११७ अशा १५०१ गावांची सुधारीत पैसेवारी ही ५० पैशांच्यावर आली आहे. आता १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी १२९५ गावांची पैसेवारी होती ५० पैशांच्या आत गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील १५०१ गावांपैकी तब्बल १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत होती.
त्यानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थिती चांगली आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये शासनातर्फे कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र लाभ मिळाला नव्हता.