विलास बारी, जळगावJalgaon Gramin Vidhan Sabha News: दहा वर्षानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर हे समोरा समोर आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
पूर्वीच्या एरंडोल मतदार संघाची पुर्नरचना झाली आणि जळगाव ग्रामीण मतदार संघ २००९ मध्ये तयार झाला. या मतदारसंघात धरणगाव व जळगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
मंत्री बनवणारा मतदारसंघ
मतदार संघाच्या स्थापनेनंतर हमखास मंत्रीपद देणारा हा मतदारसंघ आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर यांना कृषी, परिवहन राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्री आणि त्यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळाले आहे. आता दहा वर्षानंतर या दोघांमध्ये सामना रंगणार आहे.
दोन पक्षांच्या फुटीनंतर पहिली निवडणूक
काही महिन्यांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले. दोन्ही पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामळे या निवडणुकीत आतापासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला कौल
जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्यावेळी अमळनेर व रावेर हे दोन विधानसभा मतदार संघ वगळता ९ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीच्या स्मिता वाघ यांना ६० हजारापेक्षा जास्त मताधिक्य होते.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
गुलाबराव पाटील यांच्याकडून मतदार संघातील विकास कामे, रस्ते, पिण्याचे पाणी, शेत रस्ते, आरोग्य विषयक सुविधा या मुद्यांवर भर दिला जात आहे.
देवकरांकडून बेरोजगारी, म्हसावद येथील अपूर्ण उड्डाणपुलाचा प्रश्न, कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाचे बांधकाम या मुद्यांवर भर देण्यात येत आहे.