Jalgaon: महायुती संक्रातीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचे रणशिंग, तिन्ही पक्षात समन्वय राखणार
By सुनील पाटील | Published: January 11, 2024 04:14 PM2024-01-11T16:14:29+5:302024-01-11T16:15:14+5:30
Jalgaon Mahayuti News: महायुतीत समन्वय असावा, वाद-विवाद, मतभेद असू नये यासाठी भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या तीनही पक्षांचा १४ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे.
- सुनील पाटील
जळगाव - महायुतीत समन्वय असावा, वाद-विवाद, मतभेद असू नये यासाठी भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या तीनही पक्षांचा १४ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे. समन्वयातूनच महायुती उमेदवार जाहिर करेल अशी माहिती शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पद्मालय शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, अजित पवार गटाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिंदे गटाच्या सरिता माळी-कोल्हे आदी उपस्थित होते. १४ जानेवारी रोजी लाडवंजारी मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार, आमदार व तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, समन्वयक उपस्थित राहणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महामेळावे होत आहेत.
१५ मित्र पक्ष सहभागी होतील
राज्याच्या धर्तीवर शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट यांचा जळगाव जिल्ह्यात देखील समन्वय राहिला पाहिजे, त्यादृष्टीकोनातून तिन्ही पक्षांसह १५ मित्र पक्षांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर तिन्ही पक्षांसह आपले मित्र पक्ष आपआपल्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतील.
जिल्हास्तरावर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, अजित पवार गटाचे संजय पवार यांची समन्वय समिती स्थापन झालेली असून त्यांनी तिन्ही पक्षाची भूमिका समजून घेतल्यानंतर वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला मत मांडण्याचा अधिकार आहे. दावा करणे गैर नाही. महायुती ठरवेल तोच उमेदवार निश्चित होईल. त्याला मित्र पक्ष पाठिंबा देवून निवडून आणेल. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज देखील दूर होईल, असा दावा त्यांनी केला.