गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. याच दरम्यान, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यादेखील सातत्याने अनेकांवर टीकेचा बाण सोडत आहेत. असं असताना आता शिंदे गटाच्या आमदाराने अंधारेंवर खोचक टीका केली आहे. "सुषमा अंधारे 3 महिन्यांपूर्वी अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळेच त्या उजेडात आल्या" असं म्हणत निशाणा साधला आहे.
जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांचे आभार मानले पाहिजेत. बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला सुषमा अंधारे यांनी ओळखलं, असं पाटील यांनी म्हटलं आहे. "शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीआधी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हतं. अंधारे यांनी 40 बंडखोरांचे मनापासून आभार मानले पाहिजे."
"सुषमा ताईंनी आमचे आभार मानले पाहिजेत"
"मागच्या तीन महिन्यांपूर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत, हे अंधारात सुद्धा दिसत नव्हतं… अशा प्रकारची परिस्थिती अंधारे ताईंची होती. परंतु आज आम्ही बंड केल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रात अंधारे ताई कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडतंय.त्यामुळे सुषमा ताईंनी आमचे आभार मानले पाहिजेत, की आम्ही जर बंड केलं नसतं, तर महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही अंधारे ताईंना ओळखलं नसतं" असं किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
"जनतेचे आशीर्वाद असतील तर मला संधी मिळेल"
किशोर पाटील यांनी मंत्रिपदाची अपेक्षाही व्यक्त केली. जनतेचे आशीर्वाद असतील तर मला संधी मिळेल, पण मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो, असंही किशोर पाटील यांनी म्हटलं आहे. जळगावात सध्या भावी मंत्री म्हणून किशोर पाटील यांच्या शुभेच्छांचे बॅनरही लागले आहेत. तसेच पाचोरामध्ये पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं. माध्यमांना प्रतिक्रिया देताना किशोर पाटील यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"