जळगाव - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सध्या जळगावमधील राजकारणातील वर्चस्वावरून जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का देत महापालिकेच्या सत्तेतून बाहेर केले होते. तेव्हा भाजपाच्या ३० नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता भाजपानेही शिवसेनेवर पलटवार करण्यास सुरुवात केली असून या बंडखोर नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी केली आहे. ( BJP rebel corporators returned in BJP in Jalgaon)
भाजपाच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये घरवापसी केली आहे. सुरेश सोनावणे, शोभा बारी आणि हसिना बी. शेख हे पुन्हा एकदा भाजपावासी झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक ही काही दिवसांमध्ये होणार आहे. मात्र तत्पूर्वीच शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपची वाट धरल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने ५७ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी भाजपामध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळी भाजपाच्या २७ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार प्रतिभा कापसे पराभूत झाल्या होत्या. तर शिवसेनेच्या जयश्री महाजन या विजयी झाल्या होत्या. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते.