नाशिक : निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी जळगावच्या पोलीस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षक व वाळू ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवित असल्याचे म्हटले होते. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सादरे कुटुंबीयांनी घेतली, तसेच शनिवारी सकाळपासून पंचवटी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला़ पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर पंचवटी पोलिसांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सादरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ सादरे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सादरे यांच्याशी आपला कोणताही संबध नाही व सादरे यांना दीड वर्षांत मी कधी भेटलोही नाही. सागर चौधरी हा भाजपाचा कार्यकर्ता नसून, त्याच्याशीही आपला संबध नाही. या प्रकरणाची शासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी.- एकनाथ खडसे, महसूलमंत्री अशोक सादरे यांच्याबाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्यांच्या परिवारातील दु:खात पोलीस दल सहभागी आहे, परंतु त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे त्यांना तीन वेळा निलंबनाला सामोर जावे लागले. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने ते अस्वस्थ होते. कदाचित त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे. - डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक
जळगावच्या पोलीस अधीक्षकांवर गुन्हा दाखल
By admin | Published: October 18, 2015 2:38 AM