जळगाव/नाशिक : निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंह यांच्या नेतृत्वातील पथकामार्फत चौकशी सुरूझाली आहे.पथकातील दोन अधिकाऱ्यांनी जळगावमध्ये सुपेकर यांच्याकडून गुन्ह्यातील आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रविवारी दिवसभर हे पथक जळगावात होते. आवश्यक ती माहिती घेऊन ते नाशिकला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सुपेकर व रायते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या पथकाला आवश्यक ती माहिती दिल्याच्या वृत्तास सुपेकर यांनी दुजोरा दिला. चौकशी सुरू असल्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अजून तरी कुठल्याही हालचाली सुरू नाहीत. तपासात पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सुपेकर यांनी स्पष्ट केले. सादरे यांच्यावर दाखल असलेल्या गैरप्रकाराच्या गुन्ह्यांतील पूर्वीचे तपासाधिकारी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक किशोर पाडवी व सध्याचे तपासाधिकारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचेही जाबजबाब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. (प्रतिनिधी)विभागीय चौकशी सादरे यांच्या जळगावमधील कार्यकाळाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सिंह यांनी नाशिकमध्ये दिली़ अहवाल पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे पाठविला जाणार आहे़ सादरे यांच्यावर जळगावमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगावच्या पोलीस अधीक्षकांची चौकशी
By admin | Published: October 20, 2015 2:49 AM