- श्यामकांत सराफपाचोरा (जि. जळगाव) - मुबंईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस (क्र. १२५३३) या सुपरफास्ट गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून परधाडे-माहेजीदरम्यान भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती ‘पुष्पक’मधील जखमी प्रवाशांनी दिली.
रेल्वेला अपघात झाल्याची माहिती पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला मिळाली. यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी एका जखमीने वरील माहिती दिली.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांनी तत्काळ धाव घेत जखमींवर प्राथमिक उपचार केले व त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला. यावेळी पोलिस व वैद्यकीय प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन जखमी व त्यांच्या नातेवाइकांना धीर दिला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले होते. सायंकाळी ६:१५ वाजता पाच ते सहा जखमींना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.अपघातानंतर पुष्पक एक्सप्रेस पाचोरा येथे पोहोचली. यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.
मन हेलावणारे दृश्यज्यावेळी चेन ओढल्याने पुष्पक एक्सप्रेस थांबली. त्यावेळी काय झाले, हे पाहण्यास काही प्रवासी खाली उतरले होते. मात्र, त्याच वेळी विरुद्ध बाजूने कर्नाटक एक्सप्रेस आली. यापैकी काही जणांना चिरडून निघून गेली. त्यावेळी हे मन हेलावणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील.