ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीपाठोपाठ जळगावात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
राज्यात लक्षवेधी निवडणूकगेल्यावेळी विधान परिषदेसाठी झालेली निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली होती. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे पुत्र व अपक्ष उमेदवार मनीष जैन यांच्या विरोधात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे पुत्र व भाजपाचे उमेदवार स्व.निखिल खडसे व राष्ट्रवादीकडून अनिल चौधरी यांच्यात ही लढत झाली होती. यात सुरेशदादा जैन यांच्या पाठिंब्यामुळे मनीष जैन विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनीष जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी केल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर येत असल्याने आमदारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सोनवणे यांच्या माघारीनंतर डॉ.गुरुमुख जगवाणी बिनविरोधमनीष जैन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपातर्फे डॉ.गुरुमुख जगवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करण पवार यांचा अर्ज अपात्र ठरल्याने दुसरे उमेदवार नगरसेवक कैलास सोनवणे व डॉ.जगवाणी यांच्यात सरळ लढत होती. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोनवणे यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे डॉ.जगवाणी यांची बिनविरोध निवड झाली होती.
बहुरंगी लढतीची शक्यताजिल्ह्यात भाजपा व शिवसेना यांची जि.प., जिल्हा बँकसह काही बाजार समित्यांमध्ये युती आहे. सध्या मात्र दोन्ही पक्षांचे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचीदेखील आघाडी झालेली नाही. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
डॉ.जगवाणी, देवकरांसह अनेकांची नावे चर्चेतभाजपाकडून विद्यमान आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्यासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेतर्फे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या पसंतीच्या उमेदवार राहणार आहे. उपमहापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसतर्फे रावेरच्या नगराध्यक्षा रिया पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीश गनवाणी, चोपड्याच्या नगरसेविका लता छाजेड व मेहमूद बागवान यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. २२ रोजी राष्ट्रवादीचे निरीक्षक दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान चर्चा करून उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.