जळगाव – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असला तरी माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते असे संकेत माजी मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी दिलेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसवगळता इतर पक्षांची युती होते का? या विषयीची उत्सुकता त्यांनी कायम ठेवली आहे. रविवारी काँग्रेसवगळता इतर पक्षांची बैठक होणार होती मात्र सायंकाळी भाजपा कोअर कमिटीची गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
काँग्रेसकडून सोयीचे राजकारण
काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या दोन बैठकींना हजेरी लावली. नंतर मात्र भाजपा जातीयवादी पक्ष असल्याचं सांगत वेगळी भूमिका घेतला. हा प्रकार म्हणजे काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते अशी टीकाही महाजन यांनी केली.
गाफील ठेवून इतरांची खलबते
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. असे असताना आम्हाला गाफील ठेवून इतर पक्षांची खलबते सुरु होती असा आरोप करत गिरीश महाजन यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेवटच्या क्षणी दगा
जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषगांने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आग्रही भूमिका घेतली. सर्वपक्षीय पॅनेलसाठी दोन-तीन बैठका सकारात्मक झाल्या. जागावाटपाचे सूत्र ठरले, त्यानंतर त्या त्या पक्षांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळावला. मात्र आता आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या सूचना असल्याचं सांगितले. शेवटच्या क्षणी असे करणे चुकीचे होते असे करायचे होते तर आम्हाला सुरुवातीलाच सांगायला हवे होते असं सांगत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
रक्षा खडसेही उमेदवारीच्या रिंगणात?
खासदार रक्षा खडसे यांना जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची हालचाल सुरू झाली आहे. भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळणार आहे. महिला राखीव संघातून उमेदवारी मिळाल्यास रोहिणी खडसे यांच्यासोबत त्यांची लढाई होईल. असे झाले तर खडसे कुटुंबीयांमध्येच सामना पाहायला मिळेल. ही लढत लक्षवेधी असेल.
इतर पक्षातील सक्षम असतील त्यांनाही उमेदवारी
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो मात्र तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचा आरोप महाजन यांनी केला. इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. ते उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. ते सक्षम असतील तर त्यांच्या उमेदवारीचा भाजपा नक्का विचार करेल असा गौप्यस्फोटही महाजन यांनी केला.