चोपडा(जळगाव) - सध्याच्या अत्याधुनिक युगात काय ऐकायला मिळेल सांगणे तसे कठीण, गावोगावी विविध देवदेवता यांची मंदिरेही आपण खूप पाहतो. मात्र नव्वदी पार करून या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या आई वडिलांचे स्मृती मंदिर बांधून तीन हजार लोकांना भोजन देणारा आधुनिक आणि मूल्य हरपलेल्या समाजात अनोखा प्रत्यय खानदेशात पाहायला मिळाला आहे.
कोरोना काळात माणुसकी शून्य समाजरचना असल्याचे दिसून आले. मात्र अशाही काळात श्रावणबाळासारखे कार्य करणारे व्यक्ती याच बदलेल्या समाजात असल्याचा अनुभव चोपडा तालुक्यात आला. वृद्धाश्रमात श्रीमंतांसह अनेकांचे आई वडील राहत असल्याचे अनुभव काही नवीन नाहीत. पण जिवंतपणी तर सेवा केलीच, परंतु मृत्यूनंतरही आई वडिलांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून कुसुंबा (ता. चोपडा) येथील ४५ वर्षीय राजेश्वर उर्फ बाळू रतन पटेल यांनी आपल्या कुसुंबे ते वढोदा रस्त्यालगतच्या शेतात सुंदर असे " आई वडिलांचे स्मृती मंदिर " बांधले आहे. त्यांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून पादुका ठेवल्या आहेत.
त्यांचे दत्तक वडील
रतन पंडित पटेल (९४) यांचे बाळू हे दत्तक पुत्र. रतन पटेल यांचे ११ महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. ८० वर्षीय आई शकुंतला रतन पटेल अवघ्या सात दिवसाचे अंतराने वारली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश्वर पटेल यांचे हे कार्य पाहून तरी आई वडिलांना वागवण्याची आधुनिक काळातील मुलांची मनोधारणा वृध्दींगत व्हावी हा दृष्टिकोन मंदिर निर्माण मागची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .