जालना जिल्हा बँकेची निवडणूक एकमेकांच्या कट्टर विरोधकांनी बिनविरोध केली खरी परंतू या विचित्र युतीत माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारच्या आज काचा फुटल्या आहेत. विचित्र युतीचे पडसाद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीतच दिसून आले आहेत. लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी टोपे यांच्या कारवर शाईफेकही केली आहे. यावरून आता टोपे विरुद्ध लोणीकर असा संघर्ष सुरु झाला आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजपचे बबनराव लोणीकर, शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे यांनी बिनविरोध करत १७ उमेदवार निवडूण आणले होते. यामुळे बँकेचे अध्यक्ष पदही वाटून घेण्यात आले होते. परंतू, उपाध्यक्ष पदावरून कट्टर सत्ताधाऱ्यांत बिनसले आणि आज जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोरच टोपेंच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच काळी शाई देखील फेकण्यात आल्याचा प्रकार घडला.
यावर बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर लाठ्या-काठ्यांनी व दगडफेक करून हल्ला केल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे. त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद पाहिजे होते, हेच यामागचे कारण होते. परंतू, आम्ही टर्म वाटून घेतली होती व आमची बारी होती. पुढच्या वेळेस लोणीकर गटाचे अध्यक्ष होणार होते. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे सुद्धा या ठरलेल्यात आहेत. असे असतानाही हा हल्ला होणे हे लोकशाहीला व जालना शहराला व जिल्ह्याला शोभणारे नाही, अशी टीका टोपे यांनी केली आहे.
माझा प्रयत्न आहे की हे प्रकरण जास्त पुढे जाऊ नये. मी दोघांनाही या ठिकाणी बोलणार आहे की झालेला प्रकार इथे थांबवूया. लोणीकरांना सांगणार आहे की या प्रकाराचे स्पष्टीकरण द्यावे, असे खोतकर यावेळी म्हणाले.
तर यावर लोणीकरांकडूनही उत्तर आले आहे. जालना मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. व्हाईस चेअरमन लोणीकर गटाला देण्याचे टोपेनी आश्वासन दिले होते. टोपेंनी लोणीकर गटासोबत विश्वासघात केला आहे. कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोपेंची गाडी फोडली आहे. टोपेंच्या गाडीचे नुकसान आम्ही भरून देवू. टोपेंनी संघर्ष करू नये, संघर्ष केल्यास आम्ही देखील रस्त्यावर उतरू, असा इशारा लोणीकर यांनी दिला आहे.