मुंबई - विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक जागा कमी झाल्या. अबकी बार 220 पारचा नारा देणाऱ्या युतीला 170 च्या आतच समाधान मानावे लागले. भाजप आणि शिवसेनेची अनेक जिल्ह्यात पिछेहट झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी आघाडीने भाजप-शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला आहे. तर जालना जिल्हा शिवसेना मुक्त झाला आहे.
मराठवाडा हा शिवसेनेचा गड मानला जातो. मराठवाड्यात शिवसेनेचे प्रस्त मजबूत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून या गडाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेला औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्यानंतर विधानसभेला औरंगाबादेतून शिवसेनेने विधानसभेला जास्त नुकसान होऊ न देता कन्नडची जागा आपल्याकडे मिळवली. मात्र जालन्यातून शिवसेनेची पिछेहट झाली आहे.
आधीच शिवसेनेला जालना जिल्ह्यात तीनऐवजी दोनच जागा वाट्याला आल्या. हट्ट करूनही बदनापूरची जागा भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यानंतर जालना आणि घनसावंगीची जागा शिवसेनेला मिळाली. या दोन्ही जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. घनसावंगीतून हिकमत उढाण तर जालन्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पराभव पत्करावा लागला.
शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल्या आहेत.