बाबासाहेब म्हस्के
जालना, दि. 20 : किशोर डांगे या शरीरसौष्ठवपटूने नुकत्याच झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत तिरंगा फडकावताना रौप्यपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला. लॉस एंजिल्स येथे झालेल्या या स्पर्धेत जालना पोलीस दलात कार्यरत असणा-या किशोर डांगे याने हे रौप्यपदक ३४ वर्षांखालील १00 किलो वजन गटात जिंकले. मलेशियाच्या खेळाडूने सुवर्ण तर अमेरिकेने कास्यपदक पटकावले.जागतिक पोलीस स्पर्धेतील किशोरचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने २0१३ मध्ये गोल्डन कामगिरी केली होती तसेच २0११ मध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दुबई क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने रौप्य, तर सौदीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्र श्री, मराठवाडा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत. जागतिक पोलीस स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर त्याचे शनिवारी जालन्यात आगमन झाले. यावेळी लोकमतशी बोलताना शरीरसौष्ठव स्पर्धेतील सहभाग आणि या क्षेत्रातील संघर्षाबद्दल त्याने अनुभव कथन केले.
तो म्हणाला, जागतिक पोलीस स्पर्धेत निवड झाल्यानंतर देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय होते; पण रौप्य पदावर समाधान मानावे लागले असले तरी भविष्यात देशासाठी विविध पदके मिळविण्याचा आपला प्रयत्न राहील. शरीरसौष्ठव स्पर्धांत सहभागी होण्यासाठी सातत्य आणि आर्थिक तजवीज महत्त्वाची असते. व्यायामात सातत्य ठेवण्यात यश आले असले तरी खुराकसाठी आर्थिक चणचण भासते, अशी खंत त्याने बोलून दाखविली. आतापर्यंत अनेकांनी मदत केली आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही मोलाची मदत केल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
जालना शहरात विजयी मिरवणूककिशोर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेसने जालना स्थानकावर पोहोचला. फेटा बांधून किशोरची फूल व तिरंगी झेंड्यांनी सजविलेल्या लाल रंगाच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. गांधीचमन, मस्तगड, सुभाष चौक, मामा चौक, फुलबाजार, शिवाजी पुतळा, बडी सडक मार्गे काढलेल्या मिरवणुकीचा सायंकाळी सात वाजता किशोरच्या कन्हैयानगरातील घराजवळ समारोप करण्यात आला.