नागपूर : राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. मात्र नागपूर कृषी विभागाला या अभियानातर्गंत मिळालेला १४ लाख रुपयांचा निधी विहित कालावधीत खर्च न झाल्याने परत गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरेड तालुक्यातील हा निधी आहे. कृषी विभागाच्या मते, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता हा निधी प्राप्त झाला होता. त्यावर कृषी विभागाने लगेच बिल तयार करून, त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत सर्व बिले ट्रेझरीमध्ये सादर केलीत. परंतु ट्रेझरीमध्ये ते मंजूर न करता परत पाठविण्यात आले. यामुळे तो निधी अखर्चित म्हणून परत गेल्याचे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या शिवाय कोरडवाहू अभियान आणि भाडेपट्टीचाही अखर्चित निधी शासनाकडे परत गेल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियानातर्गंत अनेक कामे करण्यात आली. शिवाय त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदासुद्धा होत आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या अभियानाचा निधी परत गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त’चा निधी गेला परत
By admin | Published: May 13, 2016 4:01 AM