मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याकरिता शासनातर्फे रविवारी व्यक्ती विकास केंद्र - आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुरूदेव श्री श्री रवीशंकर उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात वाटूरमध्ये जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यावर्षी पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमधील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करत आहे. यावेळी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागानेदेखील सामंजस्य करार केला.
२४ जिल्ह्यांत कामे करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र - आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यात जलयुक्तची कामे होणार आहेत.
जलयुक्त शिवारचे देशात यश : फडणवीस- यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या २२ हजार गावांमध्ये मोठे काम झाले. - केंद्राने २०२०मध्ये जो अहवाल दिला, त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला, असे नमूद केले आहे. यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे.