मुंबई - राज्यातील सत्तेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती आल्या असून मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी वैफल्यग्रस्त झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेवरून देखील भाजपला टोला लागवला.
राज्यात मागील पाच वर्षात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र ही जलसंधारण योजना आमचीच होती. आमच्या सरकारच्या काळातच ही योजना राबविण्यास सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचे केवळ ब्रँडींग आणि पॅकिंग केले होते. याउलट योजनेचे ठेकेदारीकरण करून भ्रष्टाचाराला वाट मोकळी करून दिल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
दरम्यान अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरून टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्या सरकारच्या धोरणांवर खुशाल टीका करू शकतात, असंही चव्हाण म्हणाले.