यवतमाळ : एककाळ असा होता जांबुवंतराव धोटे हाच पक्ष, जांबुवंतराव धोटे हेच पक्षाचे निशाण व जांबुवंतराव धोटे म्हणजेच पक्षाचा जाहीरनामा असे समीकरण झाले होते. त्यांच्या शब्दाखातर विदर्भाने फॉरवर्ड ब्लॉकचे १८ आमदार निवडून दिले होते. अनेकांना त्यांनी मंत्री केले.जांबुवंतराव बापुरावजी धोटे यांचा जन्म ९ जून १९३४ साली यवतमाळ तालुक्यातील अंतरगाव येथे झाला. १९५८मध्ये यवतमाळच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये त्यांनीे शारीरिक शिक्षण शिक्षकाची नोकरी केली. १९५९मध्ये नगरपरिषदेची निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना हक्क मिळवून दिले. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आयुष्यभर त्यांनी आंदोलने केली. स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी अलिकडेच सेवाग्राम ते नागपूर ही पदयात्रा काढली होती. दोन वेळा खासदार आणि पाच वेळा आमदार राहिलेले जांबुवंतराव धोटे १९६२मध्ये यवतमाळातून आमदार झाले होते. त्यानंतर १९६७मध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून निवडणूक लढविली. १९७८ साली ते काँग्रेस पक्षाकडून लढले होते. १९७१ आणि १९७८मध्ये नागपूर येथून लोकसभेवर निवडून गेले होते. यादरम्यान त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा त्याग करून १९७८मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही काळ ते शिवसेनेतही गेले होते. ९ सप्टेंबर २००२ रोजी विदर्भ जनता काँग्रेसची त्यांनी स्थापना केली होती. जांबुवंतरावांनी चित्रपट व नाट्य सृष्टीतही काही काळ जम बसविला होता. त्यांचा ‘जागो’ हा सिनेमा त्याकाळी गाजला होता. कुस्तीचे अनेक फड त्यांनी गाजविले होते. ‘बलिदान’ साप्ताहिकाद्वारे त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विदर्भ राज्य द्रोह्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र या निवडणुकीच्या निकालापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व अन्य मान्यवरांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)या वादळाला माझे अभिवादनविदर्भाचे लोकनेते, गरिबांचे कैवारी, लढाऊ कार्यकर्ता, व्यासंगी वक्ता हे ज्यांच्या आयुष्याचे विविध पैलू होते, त्या जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय चळवळीचा चालताबोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. भाऊंच्या निधनाने एक वादळ कायमचे शांत झाले आहे. विद्यार्थी जीवनापासून जांबुवंतरावजींशी माझा संबंध आला. माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये आणले. इंदिरा गांधी यांच्या संघर्षाच्या दिवसात बाबूजींसोबत भाऊंनी सुद्धा इंदिराजींना साथ दिली. त्यावेळी विदर्भाच्या राजकारणात भाऊ म्हणजे जांबुवंतराव, भैया (जवाहरलाल दर्डा), बापू (वसंतराव साठे), एन.के.पी. साळवे आणि नाशिकराव तिरपुडे या नेत्यांची मैत्री प्रसिद्ध होती. भाऊंनी आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री घडविले. त्यांच्यासारखी ही नेतृत्व क्षमता इतरांमध्ये नव्हती. भाऊंचे दर्डा परिवार आणि लोकमतवर प्रेम होते. या वादळाला माझी विन्रम श्रद्धांजली. - विजय दर्डा, माजी खासदार आणि चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न नेहमी पोटतिडकीने मांडले.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
जांबुवंतराव धोटे हाच पक्ष...
By admin | Published: February 19, 2017 5:14 AM