मुंबई- भाजपकडून आयोजिलेल्या करण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आम्हाला सांगे ब्रह्मज्ञान अन्...भाजपने आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. ही यात्रा मुंबईतून सुरू झाली होती. नारायण राणे मुंबई विमानतळावर येताच मोठी गर्दी त्यांना घ्यायला जमा झाली होती. यानंतर, या जनआशीर्वाद यात्रेतही मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी आहेत. यावेळी, कोरोना आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावरही त्यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्र्यांनी चिंता करणं योग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी अशी काळजी करायलाच हवी. पण, मुख्यमंत्र्यांनी अशी चिंता करताना राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे, काँग्रेसला सांगितलं पाहिजे आणि शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. केवळ, आम्हाला ब्रह्मज्ञान आणि त्यांच्यासाठी कोरडे पाषाण.. असं मुख्यमंत्र्यांनी करू नये, हीच अपेक्षा, असे फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले नारायण राणे -मुंबई विमानतळावरून सुरू झालेल्या यात्रेनंतर राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन, त्यांना अभिवादन केले. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार असून ती जिंकून देणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्यासोबत प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचीही ती जबाबदारी आहे. यावेळी पालिका निवडणुकीत तुम्ही भाजापची सत्ता आलेली पाहाल, असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला.
राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्यासह राणेंचे सुपुत्र निलेश राणेदेखील उपस्थित होते.