ठाणे : जनधन आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर असून मुद्रा योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावची सुरुवात झाली आहे. पूर्वी मोठे कर्जदार, कमी ग्राहक आणि जास्त नफा हेच उद्दिष्ट बँकांचे असायचे. आता मुद्रा योजनेमुळे सामान्य व्यक्ती आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही केंद्रस्थानी मानून बँकांना मुद्रा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कितीही अडचणी असल्या, तरी कर्जदारांनीही ज्या कारणासाठी कर्ज घेतले त्यासाठीच त्याचा उपयोग करा, असा सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.अश्वमेध प्रतिष्ठान आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे वर्तकनगरच्या वेदांत खुला रंगमंचच्या मैदानात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा अॅड. माधवी नाईक, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते. ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे या योजनेंतर्गत चार हजार ६०० लाभार्थ्यांना तीन कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात दहा लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश देण्यात आले.मुद्रा योजनेमुळे घरी व्यवसाय करणाऱ्या तसेच लघु, मध्यम आणि कुटिरोद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळेल. त्यांची आर्थिक प्रगती होईल. पूर्वी बारा बलुतेदार पद्धतीमुळे गावे समृद्ध होती. पण जसजसे बलुतेदार संपले तसतशी छोट्या व्यवसायांना उतरती कळा लागली. या व्यवसायांसाठी कर्जाची व्यवस्थाच नव्हती. मात्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली मास प्रॉडक्शनऐवजी प्रॉडक्शन बाय मासेस ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी उचलली असून त्यामुळे निश्चितच देशाच्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल होईल. छोट्या व्यावसायिकांनाही कर्ज मिळणार असल्याने छोटया उद्योगातूनच देश उभा राहील.सामान्य व्यक्तीला मुद्रा योजनेचा आधार मिळाला नसता, तर तो सावकाराकडे गेला असता. त्यातून पुन्हा दुहेरी व्याजात अडकून कर्जाच्या खाईत बुडाला असता. त्यामुळे अशा योजना राबविणाऱ्या टीजेएसबीसारख्या बँकांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. (प्रतिनिधी)>तीन कोटींचे कर्ज मंजूरअश्वमेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुरेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, ठाणे जनता सहकारी बँकेमार्फत चार हजार ६०० लाभार्थ्यांना मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर झाले आहे. बँकेच्या ठाण्यातील २० शाखांमधून सुमारे तीन कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते डिंपल संहिता, अनुपम गोडबोले, राजकुमार जयस्वाल, वंदना देसाई, अमर विश्वकर्मा, मोहन भंडारे आणि अनिता उतेकर अशा दहा जणांना कर्जाचे धनादेश देण्यात आले. याप्रसंगी टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार मेनन, संचालक विद्याधर वैशंपायन, व्यवस्थापकीय संचालक सुनील साठे उपस्थित होते. >पदाधिकारी-पत्रकार वादकार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या महिला पदाधिकारी हर्षला बुबेरा यांनी ‘बाजुला व्हा, अन्यथा कॉलर धरून बाहेर काढेन,’ अशी तंबी एका पत्रकाराला दिली. त्यामुळे ऐन कार्यक्रमात छायाचित्रकार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. अखेर शहर अध्यक्ष संदीप लेले आणि पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी हा वाद मिटविला.>वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा; जनधन योजनेत १२ कोटी खाती माझा वाढदिवस साजरा करू नये, बॅनरबाजी करू नये, असे आदेश पंतप्रधानांनी दिल्यामुळे त्यांचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचे भाजपने ठरविल्याचे ते म्हणाले. येत्या तीन वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत पाच कोटी कुटुंबांना गॅस शेगडी दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या जनधन योजनेत पाच कोटी खाती उघडण्याचे उद्दिष्ट असतांना १२ कोटी खाती उघडण्याचा विक्र म झाला. सरकारकडून विविध लाभार्थींना मिळणारी रक्कम, अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने गैरव्यवहार कमी होण्यास मदत झाली.आपला देश तरु णाईचा आहे हे ओळखून पंतप्रधानांनी कौशल्य विकासावर भर दिला, तरु णाई, लोकशाही आणि मागणी या तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यामुळे देशातील बाजारपेठ मजबूत करून त्याचा फायदा आपल्या लोकांना आणि इतर देशांनाही व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
जनधन, प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल
By admin | Published: September 19, 2016 5:24 AM