उस्मानाबाद, दि. 11 : एका इसमाविरूध्द जात पंचायत बसवून दोन लाखाचा दंड ठोठावत दंड न भरल्यास जातीतून वाळीत टाकू, असा निर्णय देणा-या जात पंचायतीच्या अध्यक्षासह पाच जणांविरूध्द गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मागील एक महिन्यापूर्वी उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर भागात घडली होती़शहरातील साठे नगर भागात राहणारे रजनीकांत अशोक पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाची उपजिविका भागवितात़ मागील दीड महिन्यापूर्वी रजनीकांत पवार याने रिक्षातून एका महिलेला कारागृहाजवळ सोडले होते़ रिक्षाचे भाडे नंतर देते असे सांगून त्या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला होता़ नंतर भाड्याचे पैैसे घेऊन जा, म्हणून दोन-तीन वेळा फोन केला होता़ या कारणावरून सुनिल उध्दव चव्हाण याने संशय घेऊन मागील एक महिन्यापूर्वी पापनाश नगर भागात अप्पा तात्या पवार यांच्या घरासमोर रजनीकांत पवार विरूध्द जात पंचायत बसविली होती़ जात पंचायतीचे अध्यक्ष अप्पा तात्या पवार हे होते़ तर झिंग्या सरदार पवार, राजेंद्र जिमा काळे, ज्ञानेश्वर काळे (सर्व रा़ उस्मानाबाद) व सुनिल उध्दव चव्हाण हे सदस्य होते़.
या पंचायतीत रजनीकांत पवार याला दोन लाख रूपयांचा दंड लावण्यात आला़ दंड नाही भरला तर जातीतून वाळीत टाकून समाजापासून बहिष्कार टाकू, असा निर्णय देण्यात आला होता़. त्यानंतर रजनीकांत पवार याने त्याच्या आईकडून २० हजार रूपये घेऊन सुनिल चव्हाण याला दिले़ नंतर रिक्षा विकून आईला पैैसे परत केले होते, अशी फिर्याद रजनिकांत पवार याने शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून जातपंचायतीचे अध्यक्ष अप्पा तात्या पवार, सुनिल उध्दव चव्हाण, झिंग्या सरदार पवार, राजेंद्र जिमा काळे, ज्ञानेश्वर काळे (सर्व रा़ पापनाशनगर, उस्मानाबाद) यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ या कायद्यानुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे़ तसेच खंडणीचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ तिघे पोलिसांच्या ताब्यातजात पंचायत बसविणाºया पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल होताच पोनि सुनिल नेवासे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोहेकॉ संजय सूर्यवंशी, पोना दीपक नाईकवाडी, पोहेकॉ पी़ए़आहेर यांनी कारवाई करीत अप्पा पवार, ज्ञानेश्वर काळे, झिंग्या पवार या तिघांना ताब्यात घेतले़ इतरांचा शोध सुरू असून, ताब्यातील तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोनि सुनिल नेवासे यांनी दिली़