राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड उलथापलथी होत आहेत. यातच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड होणे आणि त्यांनी सत्ता सोडणे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे, शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात जाणे आदी गोष्टींभोवती राज्याचे राजकारण फिरू लागले आहे. अशातच औरंगाबादमधील राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाने राजकारणात खळबळ उडाली आहे.
वेदमूर्ती अनंत पांडव यांनी केलेल्या भाकितांमध्ये एकनाथ शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असे म्हटलेले असले तरी त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे म्हटले आहे. परंतू हे सांगताना त्यांनी शिंदे आगामी काळात ताकदवान नेता होणार असल्याचेही म्हटले आहे. याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतही भविष्यवाणी केली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार, जानेवारीनंतर त्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल अगदी पूर्ववत होऊ शकते, असा दावा पांडव यांनी केला आहे. म्हणजेच शिवसेना आणि धनुष्यबाणवर निर्णय होऊन तो पुन्हा ठाकरेंना मिळू शकतो, असा याचा अर्थ लावला जात आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी जानेवारी महिन्यातच होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत शनि आणि गुरु महाराज असल्याने सहकाऱ्यांसोबत मतभेद उत्पन्न होऊ शकतात. एप्रिलपर्यंत ही स्थिती असेल. त्याचा त्यांना मानसिक त्रास होईल. जानेवारीनंतर स्थिरावता लाभेल. एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे मार्गक्रमण करतील. काहीही झाले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबतच असतील असे पांडव म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या कुंडलीत काय...महाराष्ट्रच्या कुंडलीत आगामी काळात अस्थिरता असल्याचे पांडव म्हणाले. महाराष्ट्राच्या कुंडलीत शनि आणि गुरुचे भ्रमण असल्याने राज्यात अस्थिरता निर्माण होईल. विविध पक्षांमध्ये अस्थैर्य दिसून येईल. सरकार पडेल याची शक्यता कमी आहे, असे त्यांनी भाकीत वर्तविले आहे.