औरंगाबाद : मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ‘वॉटर ग्रीड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यासाठी १५ हजार कोटींची तरतूद अपेक्षित आहे. जपानच्या वित्तीय संस्थेकडून १ टक्का व्याजाने या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी, अशी अट संबंधित वित्तीय संस्थेने घातल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पावर चर्चा होऊन मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचे मंत्री लोणीकर म्हणाले. मराठवाड्यात काही वर्षांपासून कमी पाऊस पडतो. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते. परिणामी, टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गुजरात, तेलंगण, तामिळनाडू राज्यांतील वॉटर ग्रीड योजनेच्या धर्तीवर हा प्रकल्प पुढे आणला आहे, असे त्यांनी सांगितले.असे आहे ग्रीडचे नियोजन मोठ्या धरणांतून पाणी घेणे आणि त्याचे वितरण करणे, या संकल्पनेला ‘वॉटर ग्रीड’ म्हणतात. जायकवाडीवरील धरण क्षेत्रातून ८.४६ टीएमसी, खडकपूर्णा धरण ०.८३ टीएमसी, उजनी धरणातून ५.८५ टीएमसी, इसापूर धरण ३.३८ टीएमसी, वाघूर धरणातून ०.१० टीएमसी पाणी घेण्यात येईल.दोन टप्प्यांत काम पहिल्या टप्प्यात उजनीतील पाणी मांजरा धरणात आणणे. मराठवाड्यातील ४० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी लागतील. दुसऱ्या टप्प्यात इसापूरचे पाणी ऊर्ध्व मानार धरण क्षेत्रात आणणे. तसेच जायकवाडीवरील धरण क्षेत्रातून पाणी आणणे. जायकवाडीचे पाणी माजलगाव धरण क्षेत्रात नेणे. ८ जिल्ह्यांतील ६० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे, यासाठी ८ हजार ५०० कोटी लागतील.
‘वॉटर ग्रीड’साठी जपानकडून १ टक्का व्याजाने कर्ज घेणार
By admin | Published: October 01, 2016 1:18 AM