मुंबई : जपानमधील उद्योगांकडून महाराष्ट्रात २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केला. शिवाय जागतिक बँकेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आठव्या क्रमांकावर फेकला जाण्याकरिता मागील सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.देसाई म्हणाले की, जपानमधील किमान ४-५ बड्या उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकरिता सक्रिय सहमती दर्शविली आहे. प्रत्येक उद्योग किमान ५ ते १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतो या क्षमतेचा आहे. त्यामुळे २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र त्यामुळे रोजगार किती उपलब्ध होईल, ते सांगता येणार नाही. कारण प्रत्येक उद्योगाची रोजगारनिर्मितीची क्षमता भिन्न आहे. उद्योगस्नेह वातावरण निर्माण करण्यात महाराष्ट्र आठव्या स्थानावर असल्याच्या जागतिक बँकेच्या निष्कर्षाकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले की, राज्यात नवे सरकार आल्यावर या दिशेने जून महिन्यापर्यंत झालेल्या प्रयत्नांचीच दखल हा अहवाल तयार करताना घेतली गेली. त्यानंतरच्या प्रयत्नांची दखल घेतली गेली असती तर महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागला असता. पुढील सर्वेक्षणात महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये लागेल, असा विश्वास देसार्इंनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
जपानी कंपन्यांकडून २५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
By admin | Published: September 16, 2015 1:13 AM