मुंबई : मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन, शिवडी ते न्हावाशेवादरम्यानच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक आणि अजिंठा व लोणारमध्ये पर्यटन सुविधांच्या उभारणीसाठी भरीव अर्थसाहाय्य देण्याची घोषणा जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीतर्फे (जायका) करण्यात आली; तर जपानच्या गुंतवणूकदार कंपन्यांच्या सोयीसाठी राज्यात स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.जायकाचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिदाइकी डोमोची, दक्षिण आशियाई विभागाचे महासंचालक अरेई, भारतातील प्रतिनिधी साकामोटो यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज टोकियो येथे चर्चा केली.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पाठबळ देण्याची तयारी जायकाने दर्शविली आहे. ही बुलेट ट्रेन नाशिकमार्गे नेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना जायकाने मान्य केली. औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथेही पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करण्याची जायकाने तयारी दर्शविली.एमआयडीसी आणि जेट्रोच्या वतीने आज महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात टोकियोत परिसंवाद झाला. सॉफ्टबँक समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांच्याशी चर्चा करण्यात आली. एसबी एनर्जीचे कार्यकारी अध्यक्ष मनोज कोहली, वरिष्ठ अधिकारी तोराहिको (टायगर) उएडा आदी उपस्थित होते. सॉफ्ट बँक ही जगातील ६२ व्या क्र मांकाची मोठी संस्था असून ब्रॉडबँड, ई-कॉमर्स, इंटरनेट, संबंधित तांत्रिक सेवा, वित्त पुरवठा, माध्यमे आणि विपणन आदी क्षेत्रातील जपानची आघाडीची बहुराष्ट्रीय संस्था आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मासायोशी यांनी दूरसंचार आणि इंटरनेट आदींबाबत चर्चा केली. जपानी उद्योजकांसाठी सुपा येथील औद्योगिक वसाहतीबाबतच्या निर्णयाचे जपानच्या उद्योगमंत्र्यांनी स्वागत केले. पोराईट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मासानोरी किकूची यांनी तळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील २०० कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला. जपानचे भूमी, पायाभूत सुविधा, परिवहन आणि पर्यटनमंत्री अकिहिरो ओटा यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी शिनकानसेन या संस्थेचे सहकार्य देण्याची विनंती त्यांनी अकिहिरो यांना केली. शिनकानसेन हे जपानमधील अतिवेगवान रेल्वेमार्गाचे जाळे असून चार प्रमुख जपानी रेल्वे समूहांकडून त्यांचे व्यवस्थापन पाहिले जाते. (विशेष प्रतिनिधी)जपान कक्ष उभारणारजेट्रोच्या मदतीने महाराष्ट्रात सुपा येथे जपानी औद्योगिक पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. जपानच्या गुंतवणूकदार कंपन्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यात एक जपान कक्ष स्वतंत्ररीत्या निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज टोकियो येथे केली.वित्त, व्यापार मंत्र्यांचे आश्वासन... मुख्यमंत्र्यांची जपानचे वित्त, व्यापार आणि उद्योगमंत्री योईची मियाझावा यांच्याशी चर्चा झाली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) या प्रकल्पाबाबत जलदगतीने कार्यवाही करण्याबाबत मियाझावा यांनी या चर्चेदरम्यान सहमती दर्शविली.मेट्रोसाठी मिळणार मदतजपानचे वित्त, व्यापार आणि उद्योगमंत्री योईची मियाझावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील चर्चेत मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मेट्रोच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याबाबत दोन्ही पक्षांत एकमत झाले. तसेच नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रात स्मार्ट सिटी विकसित करण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
राज्य विकासाला जपानी ‘जायका’
By admin | Published: September 12, 2015 4:59 AM