ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - सत्ताधारी युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) नागपूर महानगरपालिकेत भाजपची साथ नको आहे. युतीबाबत अद्याप काही चर्चाही झालेली नाही. यातच रासपने महापालिकेतील राखीव जागा स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपची युती आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हेराज्यात मंत्री आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही ही युती कायम राहील अशी अपेक्षा होती. नागपुरात रासपचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे भाजपसोबत युती करून काही जागा पदरात पाडून महापलिकेत खाते उघडण्याची रासपला संधी आहे. परंतु युतीबाबत काही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. यातच रासप नागपुरात अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव असलेल्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जाते. आज-उद्या याची जाहीर घोषणा सुद्धा करण्यात येणार आहे.राखीव जागा स्वबळावर लढणारयुतीबाबत आम्हाला कुठलेही आदेश नाही. परंतु पक्षाच्या अनुसूचित जाती, जमाती आघाडीच्यावतीने आम्हाला स्वबळावर लढण्याचे आदेश मिळालेले आहेत. त्यामुळे आम्ही राखीव जागा लढणार आहोत. इतर जागांबाबत अद्याप आम्हालाकुठलेही आदेश नाहीत. येत्या २२ तारखेला पक्षाचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब दोळतल्ले हे नागपुरात येत आहेत. तेव्हा यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल - मिलिंद खैरकर, प्रदेश सरचिटणीस, रासप, अनुसूचित जाती, जमाती आघाडी.