मुंबई : देशभर ‘घर वापसी’चा कार्यक्रम करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी आपली पत्नी जशोदाबेन यांची घर वापसी करावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांच्यावर टीका केली.महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्या पंतप्रधानांनी स्वत:च्या पत्नीला ४० वर्षांपूर्वी वाऱ्यावर सोडून दिले; स्मृती इराणींना मात्र कॅबिनेट मंत्रिपद दिले, असे सांगत कामत यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मालमत्ता कर, पार्किंग दर आणि बेस्ट दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसने मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेली ४० वर्षे मोदी जशोदाबेन यांच्याकडे फिरकले नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ कारवाई टाळण्यासाठी मोदींनी प्रतिज्ञापत्रात जशोदाबेन यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला. त्याआधीच्या चार निवडणुकांत मात्र तसा उल्लेख नव्हता. एकीकडे जशोदाबेन रिक्षात फिरत आहेत तर दुसरीकडे नवख्या स्मृती इराणींना बंगला सर्व सुविधा मिळतात. जशोदाबेन रिक्षात आणि त्यांचे सुरक्षारक्षक गाडीत, अशी परिस्थिती आहे. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सशक्तीकरणाची पंतप्रधानांची घोषणा हा भंपकपणा असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. (प्रतिनिधी)
आधी जशोदाबेन यांची ‘घर वापसी’ करा
By admin | Published: January 28, 2015 5:17 AM