ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २५ : किरकोळ घरगुती वादामुळे जावयाला जाळून मारणारी सासू, साडू आणि दोन मेहुणे अशा चौघांना सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मृताच्या पत्नीची निर्दोष मुक्तता झाली. एन-६ सिडको येथील अजय अशोक गवळे यांच्या मृत्युपूर्व जबाबावरून तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार अजय व जयश्री या दोघांचा विवाह झालेला होता. अजय लक्ष्मी कॉलनीतून एन-६ सिडको येथे पत्नीसह राहण्यासाठी आला होता. दरम्यान ३१ मे २०११ रोजी सकाळी अजय व जयश्री या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे जयश्रीने सिडको पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली होती.
त्याच दिवशी सायंकाळी बहिणीला मारहाण केली म्हणून जयश्रीचे भाऊ रवी (२२), कैलास, आई कांताबाई गायकवाड व अजयचा साडू विनोद मगरे (३०, सर्व रा. एन- ६, सिडको) हे घरी आले. या चौघांनी अजयला शिवीगाळ व बेदम मारहाण केली. विनोद मगरे याने अजयच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत अजय घराबाहेर आला असता गल्लीतील नागरिकांनी अजयच्या अंगावर शाल टाकून आग विझविली. त्यानंतर अजयला पत्नी जयश्री, सासू कांताबाई व नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अजय ७३ टक्के भाजल्याचे निष्पन्न झाले.
अजयची प्रकृती अधिक खराब झाल्याने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी अजयचा मृत्युपूर्व जबाब नोंदविला. तसेच अजयने त्याचे वडील अशोक भिकाजी गवळे यांनादेखील वरीलप्रमाणे घटना सांगितली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको ठाण्याचे तत्कालीन फौजदार के. के. शिंदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील एस. व्ही. मुंडवाडकर यांनी ९ साक्षीदार व दोन मृत्युपूर्व जबाब तपासले. न्यायालयाने दोन्ही मृत्युपूर्व जबाब व साक्षी ग्राह्य धरून रवी, कैलास, कांताबाई गायकवाड व विनोद मगरे यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी अडीच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. पुराव्याअभावी जयश्रीची निर्दोष मुक्तता केली.