दापोली (जि. रत्नागिरी) : प्रेम केले म्हणून गावपुढाऱ्यांनी जातपंचायत बोलावून एका तरुणाला रात्रभर डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार दापोली तालुक्यात घडला आहे. सुजन चव्हाण असे या तरुणाचे नाव असून, घटनेनंतर त्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मारहाणीचा विषय नमूद केल्याने प्रकरणाला वाचा फुटली. परंतु चार दिवस झाले तरी अजूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.मृत सुजन हा दापोली तालुक्यातील ओणीभाटी गावातील आहे. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे जवळच्याच भडवली गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. याच प्रेमाखातर सुजन भडवली गावामध्ये गेला होता. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊही होता. मात्र, तेथे गावच्या काही प्रमुख लोकांनी त्याला जाब विचारत जातपंचायत बोलावली. भर बैठकीत सुजनला संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावपुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी सुजनला डांबूनही ठेवले होते, अशी माहिती चुलतभावाने दिली आहे. सुजन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचा असा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
जातपंचायतीकडून मारहाण; तरुणाची आत्महत्या
By admin | Published: April 25, 2017 2:19 AM