ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मुंबई सेंट्रल स्टेशनवर 23 वर्षीय आरपीएफ कॉन्स्टेबल दलवीर सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दलवीर यांनी स्टेशनवरील लॉकर रुममध्ये एके-47मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कारण स्वतःच्या लग्नासाठी त्यांना वरिष्ठांकडून मागणीनुसार सुट्टी देण्यात आली नव्हती.
दलवीर सिंह यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात दलवीरचा साखरपुडा झाला. यानंतर लग्नातील अन्य विधींसाठी 6 मार्चपासून सुट्टी न मिळाल्याने तो दुःखी झाला होता'. तर दुसरीकडे, 'मागणीनुसार दलवीर यांना 11 मार्चपासून 5 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती', असं सांगत वरिष्ठांवर आरोप फेटाळून लावले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, दलवीर यांनी शनिवारी रात्री गुजरात एक्स्प्रेस 12901मधून प्रवास करण्यापूर्वी कुटुंबीयांसोबत बातचित केली होती. मात्र, याचवेळी त्यांनी एके- 47मधून स्वतःवर गोळी झाडून आपले आयुष्य संपवल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. यानंतर दलवीर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दलवीर यांच्या आत्महत्येमुळे रेल्वे पोलीस कर्मचा-यांवरील कामाचा ताण आणि कामाच्या अतिरिक्त तासांचे ओझे, हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडून या मुद्यावर(NHRC) चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (मुंबई सेंट्रल) अनुप शुक्ला यांना सांगितले की, दलवीर यांच्या आत्महत्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच दलवीर साखरपुड्यासाठी 23 ते 29 जानेवारीपर्यंत सुट्टीवर होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कॉल तपशीलाद्वारे आत्महत्या करण्यामागील नेमके कारण शोधण्यात येईल, असे जीआरपी डीसीपी दीपक देवराज यांनी सांगितले.