रत्नागिरी : महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांत औद्योगिक प्रदूषणाची समस्या मोठी आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय करूनही काही उद्योगांकडून त्याचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे १७ प्रकारच्या प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या तीन हजार कारखान्यांमध्ये येत्या मार्चअखेर प्रदूषण मापक यंत्र बसविले जाणार आहे. हे यंत्र मुख्य संगणक केंद्राशी जोडले जाणार असून, २४ तास प्रदूषण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहे. प्रदूषण प्रमाणाच्या बाहेर होत असेल तेव्हा संगणक केंद्रात लाल दिवा लागेल. त्यामुळे उद्योजकांना याबाबत फसवणूक करता येणार नाही, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.उद्योगधंद्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात राहावे यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रदूषण कमी करणाऱ्या यंत्रणाही बसविल्या. तरीही शासनाचे अधिकारी पाहणीसाठी येतात. त्यावेळीच या यंत्रणा सुरू राहतात व नंतर नियमभंग केला जातो, अशा तक्रारी आल्यामुळेच प्रदूषणाबाबत २४ तास उद्योगांवर निगराणी राहावी, या उद्देशानेच प्रदूषण मापक यंत्रे बसविली जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात तीन हजार कारखान्यांमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यात आणखी जास्त उद्योगांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
देशात तीन हजार उद्योगांमध्ये प्रदूषणमापक यंत्र बसविणार जावडेकर : रत्नागिरीत प्रतिपादन
By admin | Published: February 16, 2015 11:30 PM