हुसेन मेमन / जव्हारशेकडो वर्षांची आदिवासींची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा मातेचा उत्सव अर्थात बोहाडा या शहरात दि. २९, ३० एप्रिल व १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव राज्याच्या प्रत्येक आदिवासी बहुल भागात साजरा केला जातो, परंतू पूर्वीचा ठाणे व आताचा पालघर हा आदिवासी जिल्हा असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ९९ टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यात विविध गांवपाड्यात सुध्दा जगदंबेचा उत्सव असलेला बोहाडा आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला व संस्कृतीची शेकडो वर्षाची परंपरा जपली जाते.रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो, विविध देवदेवतांचे मुखवटे व वेष परीधान करून आदिवासींच्या पारंपारीक संबळ वाद्याच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीनेच ही सोंगे नाचविली जातात. भक्तांच्या हातातील टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यत नाचविली जातात, देव-दानवांचे युध्द व हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंग हे बोहाड्याचे प्रमुख आकर्षण असते.जव्हार येथील जगदंबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गजाननाचे विधिवत पूजन व मिरवणूक अर्थात थाप रात्री ९ ते १२ वाजेपर्यत, दुसऱ्या दिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी १ मे ला मोठा बोहाडा रात्री ८.०० ते सकाळी ९.०० वाजे पर्यत तर दि. २ मे रोजी देवीची महापूजा सकाळी ९ वा. होऊन त्यानंतर शहरातून महिषासुर व देवीचे युध्द आणि मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली. या जगदंबा देवीची आरती करून नारळ वाहून तसेच नवस फेडून तिच्या सोंगांची पूजा करण्याची प्रथा आहे.दि. १ मे रोजी रात्री ९.०० वाजे पासून गणपती, शारदा, मारूती, नारदमुनी, कमळादेवी, सटवाई, एकादशी, महादेव, विष्णू, वाघ, पवनदेव, ब्रम्हदेव, कृष्ण, साई, अग्नीदेव, भैरोबा, खंडेराव, भस्मासूर, राम-लक्ष्मण, हीडींबा, रावण, नृसिंह, चंद्रदेव, सूर्यदेव, महिषासूर आदि २८ प्रकारची सोंगे सकाळ पर्यत काढण्यात आलील. त्यानंतर श्री जगदंबा व महिषासूर यांचे युध्द होऊन महिषासूराचा वध करून विजयी जगदंबा देवीची मोठ्या थाटत मिरवणूक काढली गेली.देव दानवांचे मुखवटे तयार करण्याची विशिष्ट पध्दत असून कागदाच्या लगद्यापासून तसेच काही जंगली वस्तूंपासुनच ते तयार केले जातात, त्यानंतर त्यांच्यावर रंगकाम करून ते सजविले जातात. एकाएका सोंगाची मिरवणूक साधारण एक ते दिड तास चालते, परंतु दैवीशक्तीमुळेच आम्हाला थकवा जाणवत नसल्याचे सोंगे नाचवणाऱ्यांनी सांगितले. २०१७ जगदंबा मोहात्सवाचे निमंत्रक हे रविंद्र शिवदे होते, तर व्यवस्थापक चित्रांगण घोलप, साईनाथ नवले, रविद्र पहाडी, भरत बेंद्रे, विवेक अहिरे, अनिल अहिरे, गणेश पहाडी, अनंता घोलप, तसेच पहाडी समाज व इतर जव्हारकरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. त्यासाठी संपूर्ण राज्यातल्या जव्हारकरांनी आपली हजेरी लावली होती. संपूर्ण उत्सव अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडला. यावेळी पोलसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. त्याबद्दल जनतेने पोलिसांचे आभार मानले आहेत.जव्हार शहरातील जगदंबा उत्सवाला संस्थान काळाच्या आधीपासूनची म्हणजेच शेकडो वर्षाची परंपरा आहे, जुन्या पिढीकडून ती सतत नव्या पिढीकडे जाते, आजपर्यंत समस्त जव्हारकर ही संस्कृती जपत आहेत, जे सोंगे नाचवतात, संबळ वाजवतात ते खरे उत्सवाचे मानकरी आहेत. जव्हार नगर परिषद, पोलीस प्रशासन व समस्त जव्हारकर यांच्या सहकार्यामुळे या वर्षीचा जगदंबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.- चित्रांगण घोलप, जव्हार
जव्हारमध्ये जगदंबा मातेचा बोहाडा उत्साहात साजरा
By admin | Published: May 03, 2017 5:07 AM