ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ८ - २००९ साली औरंगाबाद शहरात गाजलेल्या मानसी देशपांडे खून खटल्यातील आरोपी जावेद खान ऊर्फ टिंग्याला सत्र न्यायालयाने २०१२ साली ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी ‘मरेपर्यंत फाशी’ च्या शिक्षेत रुपांतरित केली.
न्या. ए. व्ही. निरगुडे आणि न्या. आय. के. जैन यांनी जावेदच्या शिक्षेत वाढ करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती करणारे शासनाचे अपील मंजूर केले. तर जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठीचे जावेदचे अपील फेटाळले. खंडपीठाने या दोन्ही अपिलांवरील निकाल २२ जानेवारी २०१६ रोजी राखून ठेवला होता, तो मंगळवारी जाहीर केला.
खटल्याची पार्श्वभूमी
अहिंसानगरमधील अपूर्वा अपार्टमेंटमध्ये अनिकेत आणि मानसी देशपांडे हे भाऊ-बहीण राहत होते. १२ जून २००९ च्या मध्यरात्री जावेद खान हबीब खान ऊर्फ टिंग्या (राहणार दु:खीनगर, जालना) हा चोरी करण्याच्या इराद्याने देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये घुसला. त्यावेळी अनिकेत रात्रपाळीला कंपनीमध्ये कामावर गेला होता.
घरात मानसी एकटीच होती. आवाज ऐकून मानसीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता जावेदने तिचे तोंड दाबून, धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. त्याने मानसीचे दोन्ही हात मोबाईलच्या चार्जरने बांधले. पाय ओढणीने बांधून तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने स्क्रू ड्रायव्हरने जखमी केले. त्यानंतर कात्रीने तब्बल २१ वार करून तिचा निर्घृण खून केला. जावेदने मानसीचा मोबाईल, सोन्याची अंगठी आणि तिच्या पर्समधील ४५० रुपये चोरून नेले.
अनिकेत पहाटे ५ वाजता रात्रपाळीवरून घरी आला असता घराचा दरवाजा बंद होता. त्याने मोबाईलवरून बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने दार उघडले नाही. कदाचित ती झोपली असेल, असे समजून अनिकेत मित्राच्या घरी जाऊन झोपला. सकाळी साडेनऊ वाजता अनिकेत परत घरी आला. हाका मारूनही तिने दार उघडले नाही म्हणून त्याने शेजाºयांना बोलावले आणि तो गॅलरीतून घरात गेला असता मानसी नग्नावस्थेत निपचित पडलेली आढळली.