ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 19 - पत्नीला नांदायला न पाठविल्याने संतप्त झाल्याने मद्यपी भाऊदास ससाणो (37) या जावयाने बाबूराव घारपडे (70) या सास-याचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली. याप्रकरणी ससाणोला पोलिसांनी अटक केली आहे.आंबेवाडी मस्जिदच्या बाजूलाच राहणा:या भाऊदासचा संगीता (35) हिच्याशी जानेवारी 2011 मध्ये विवाह झाला. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी तर अडीच वर्षाचा मुलगा आहे. भाऊदासला कामधंदा नसून त्याला दारुचे व्यसनही आहे. याच कारणावरुन पती पत्नीमध्ये नेहमी खटके उडत होते. यादरम्यान, तो पत्नीला शिवीगाळ करुन मारहाणही करायचा. त्याच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून गेल्या चार महिन्यांपासून ती आंबेवाडीतीलच आपल्या माहेरी राहत होती. तरीही दारुच्या नशेत तो तिला त्रास देत होता. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास आंबेवाडीतील हिम्मतवाला हार्डवेअर या दुकानाबाहेर बसलेल्या बाबूराव यांच्याशी पत्नीला नांदायला पाठविण्यावरुन वाद घातला. तुला दारुचे व्यसन आहे, काम धंदाही नाही, त्यामुळे मुलीला पाठविणार नसल्याचे त्यांनी जावयाला निक्षून सांगितले. यातूनच झालेल्या वादातून त्याने सास-याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना आधी ठाण्याच्या जिल्हा शासकीय त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांनाच त्यांचा 17 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. दरम्यान, सास-यावरील खूनी हल्ल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी जावयाला आधीच अटक केली होती. त्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. बाबूराव यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केल्यानंतर त्याचा 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा ताबा घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सिताराम वाघ हे अधिक तपास करीत आहेत. रागाच्या भरात हे कृत्य केले असून आता आपल्या मुलांचा कोण सांभाळ करणार असा प्रश्न करुन भाऊदासने या गुन्हयाबद्दल पोलिसांजवळ पश्चाताप व्यक्त केला.
पत्नीला नांदायला न पाठविल्याने जावयाकडून सास-याचा खून
By admin | Published: October 19, 2016 8:58 PM