पुणे : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. अद्यापही पोलीस प्रशासनाला त्यांच्या मारेक-यांच्या तपासाची दिशा सापडलेली नाही. दुसरीकडे कर्नाटक सरकारने गौरी लंकेश खून तपासात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून महाराष्ट्र शासन व सीबीआयला अपयशाला सामोरे का जावे लागत आहे. असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (दि.२०) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे, नागपूर, औरंगाबाद सह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर, महात्मा गांधीचे पणतु तुषार गांधी आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे सहभागी होणार आहेत. साने गुरुजी स्मारक येथे विविध मान्यवर मनोगत व्यक्त करणार असून यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय क लबुर्गी, मुक्ता दाभोलकर यांहा समावेश आहे. अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच इचलकरंजी येथील स्मिता पाटील कलापथक - राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने गांधींचं करायचं काय? हे एक अंकी नाटक सादर होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच केरळ, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच आॅल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या एकत्रित प्रयत्नांतून २० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, सत्यजित रग, आदी मान्यवर वैज्ञानिक बाजुने वैचारिक दृष्टीकोन याविषयावर विचार मांडणार आहेत. १९आॅगस्टच्या पूर्वसंध्येला महर्षी रामजी शिंदे पूलावर कँडेल मार्च काढण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासन व सरकारला अनेकदा फटकारुन देखील तपासात प्रगती होत नाही. हे खेदजनक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकरी एकाच संस्थेशी संबंधित असल्याचे समोर आल्याने शासनाने या संस्थेविषयीची आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, राज्यसरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी उपस्थित होते.
*आता तर मारेक-यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असून मारेकरी बॉम्ब देखील बनवु लागले आहेत. यासगळ्या सद्यस्थितीचा हेतु काय आहे? विचारवंतांवर कायमच टांगती तलवार असून लोकांना विचार कौ न देणं ही विचारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती मान खाली घालायला लावणारी आहे. दहशत पसरविणा-या संघटनांना आर्थिक पाठबळ पुरविणा-यांचा शोध घेण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.