यवतमाळ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी वयाच्या १७व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले. त्यांना १८ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी पत्रकारितेचे रोपटे लावले. निर्भीड पत्रकारितेचा त्यांनी आदर्श घालून दिला. त्यांची पत्रकारिता महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २७व्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रेरणास्थळावर हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते. मंचावर लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, माजी शालेय शिक्षणमंत्री व लोकमतचे एडीटर इन चीफ राजेंद्र दर्डा, नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगूळकर, लोकमतचे यवतमाळ कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी बाबूजींनी वर्धा येथे महात्मा गांधीजींची भेट घेऊन परवानगी मागितली. मात्र, बाबूजी अवघे १७ वर्षांचे असल्याने गांधीजींनी परवानगी दिली नाही. पुढे १८ ऑगस्ट १९४० रोजी बाबूजींनी सत्याग्रह आंदोलन केले. यामध्ये त्यांना अटक करून जबलपूर कारागृहात पाठविण्यात आले. ज्या कारागृहात सुभाषचंद्र बोस होते, तेथे बाबूजींनी १८ महिन्यांची शिक्षा भोगली.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९ मध्ये ते ‘नवे जग’ या साप्ताहिकाची स्थापना करून पत्रकारितेकडे वळले. १९५२ मध्ये द्वि-साप्ताहिक लोकमत, १९६२ मध्ये साप्ताहिक लोकमत आणि पुढे १५ डिसेंबर रोजी नागपूर येथून लोकमत वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. कणखर आणि निर्भीड पत्रकारिता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ‘लोकमत’मध्ये ‘शेतकऱ्याने थकीत कर्जासाठी मुलीला सावकाराकडे गहाण ठेवले’, असे वृत्त दिले होते. त्यावेळी अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. बातमीवर आक्षेप घेत काही सदस्यांनी ‘लोकमत’ची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली. यावर संपत्ती जप्त कराल; परंतु तुम्ही निर्भीड पत्रकारितेचे समाधान जप्त करू शकत नाही, असे बाणेदार उत्तर बाबूजींनी दिले होते, याची आठवण राज्यपाल बागडे यांनी सांगितली. १९७२ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात बाबूजी कॅबिनेट मंत्री झाले. राज्यातील प्रमुख शहरांत औद्योगिक वसाहती उभ्या राहाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याच पुढाकाराने शेंद्रा औद्याेगिक वसाहत प्रस्तावित झाली. पुढे १९९५ मध्ये युतीचे शासन आल्यानंतर राज्यात नऊ पंचतारांकित औद्योगिक वसाहती सुरू करण्याचा निर्णय झाला. बाबूजींनी प्रस्तावित केलेली शेंद्रा एमआयडीसी माझ्या पुढाकाराने कार्यान्वित झाली. बाबूजींनी स्थापन केलेले ‘लोकमत’ जसे विजय आणि राजेंद्र दर्डा यांनी पुढे नेले, तसेच शेंद्रा एमआयडीसीचे काम मी पुढे नेल्याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना बागडे यांनी व्यक्त केल्या.
काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा केला सन्मान : डॉ. विजय दर्डा
आज दोन बाबींचा मला आवर्जून उल्लेख करावास वाटतो, एक म्हणजे हरिभाऊ बागडे यांच्यासारखे सक्रिय लोकप्रतिनिधी राजस्थानचे राज्यपाल म्हणून येथे उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्यामुळे राज्यपाल पदाची खुर्ची सन्मानित झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेचाही हा सन्मान आहे. दुसरे म्हणजे, बाळासाहेब मांगूळकर यांच्यासारखा सर्वसामान्यांसाठी कायम झटणारा कार्यकर्ता यवतमाळचा आमदार म्हणून आज येथे उपस्थित आहे. मी कधीही पक्ष पाहिला नाही, मी नेहमी कामाचा सन्मान करतो, अशा शब्दांत डॉ. विजय दर्डा यांनी भावना व्यक्त केल्या. श्रद्धेय बाबूजींनी दिलेला राष्ट्रभक्तीचा विचार पुढे घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले.
विचारसरणी वेगळी, राष्ट्रभक्ती हे समान सूत्र : राजेंद्र दर्डा
हरिभाऊ बागडे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. मंत्रिपद आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. आता राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अत्यंत कुशलपणे ते सांभाळत असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. बागडे यांना आम्ही नाना म्हणतो. श्रद्धेय बाबूजी आणि नाना हे दोघेही वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. दोन्ही विचार दोन टोकाचे. पण त्यात एक समान सूत्र आहे. ते म्हणजे हे दोघेही आयुष्यभर आपापल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहिले. राष्ट्रभक्ती हे दोघांच्या विचारांचे समान सूत्र आहे, असेही ते म्हणाले.