ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 04 - उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्या भांडणात मला पडायचं नाही असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे भेटीवर बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे नाशिमकधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनधिकृत बांधकामं अधिकृत केल्यामुळे पूरपरिस्थिती आल्याची टीका केली आहे. गोदावरी नदीकाठचं सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. गोदापार्कबद्दल रिलायन्सशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.
महाड दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही. ब्रिटिशांना काळजी आहे, मात्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरही राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री तुमचाच आहे मग विदर्भाचा विकास का केला जात नाही ? विरोधकांनी वेगळ्या विषयाला हात लावू नये यासाठी स्वतंत्र विदर्भाचा विषय काढला जातो असं राज ठाकरे म्हणाले. सभागृहात विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलू देत नसल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना अजून आपण सत्तेत आलोत की नाही यावर विश्वास बसत नाही आहे, रोज रात्री स्वताला चिमटे काढून पाहत असतील असा टोमणा राज ठाकरे यांनी मारला.