जयकुमार गोरेंना मित्र पक्षाविरुद्धच द्यावी लागणार कडवी झुंज !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:51 AM2019-07-10T11:51:39+5:302019-07-10T11:54:20+5:30
आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती.
मुंबई - युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं अस म्हणत असतानाच राजकारणात सर्वकाही सदासर्वकाळ नसते असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकमेकांचे समर्थक असणारे उद्या कट्टर विरोधक होतात, तर आज विरोधक असणारे अचानक समर्थक होतात. मात्र यामुळे अनेकदा मतदार संघातील समिकरणेच बदलतात. याचाच प्रत्येय मान-खटाव मतदार संघातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध काम करणारे गोरे यांनी भाजप प्रवेश नाकारला असला तरी, आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाताना गोरे यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे गोरे काँग्रेसमध्ये राहणार हे निश्चितच आहे. तसेच ते मान-खटाव मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार राहतील यावरही शंका घेण्याचे कारण नाही.
तत्पूर्वी, आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे गोरे यांचा देखील भाजपमध्ये जाण्याचा कोणताही मनोदय नसल्याचे दिसून आले. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेली चर्चा गोरे यांच्यासाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते.
मान-खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोरे यांच्याविरुद्ध भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेणाऱ्याला स्वाभिमान जागृत ठेवून धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना ७५ हजार ७०७ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या शेखर गोरे यांना ५२ हजार ३५७ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे सदाशिव पोळ यांना ३५ हजार ५६२ आणि शिवसेनेच्या रणजीत देशमुख यांना ३१ हजार ३२ मते मिळाली होती. आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची ३५ हजार मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची सजजूत काढण्याचे आव्हान जयकुमार गोरे यांच्यासमोर आहे.