सांगली - भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने बोचरी टीका करत असतात. आता पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांच्या मनामध्ये पक्ष सोडण्याचा विचार असून, कधी एकदा शरद पवार घरी बसतात आणि मी पक्ष सोडून जातो, अशी भावना तुमच्या मनात आहे, असा चिमटा गोपिचंद पडळकर यांनी काढला आहे.
क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित आयोजित विशेष कार्यक्रमात गोपिचंद पडळकर यांनी ही तुफान फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला सदाभाऊ खोत आणि सध्या चर्चेत असलेले आमदार शहाजीबापू पाटील हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली.
जयंत पाटील यांनी एका अपघाताप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मला त्यात अडकवावं, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली होती. माझ्याविरोधात हद्दपारीची नोटिस काढली. मात्र मी घाबरलो नाही. अखेर २० जूनला विधान परिषदेचा निकाल लाला आणि दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आमदार सूरतला गेल्याची बातमी आली. तेव्हापासून जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर गेलेलं सुतक आजपर्यंत गेलेलं नाही.
जयंत पाटीस हे सत्ता असली तरच काम करू शकतात. सत्तेच्या विरोधात ते काम करू शकत नाहीत. आता शरद पवार कधी घरी बसतात, आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी भावना जयंत पाटील यांच्या मनात निर्माण झालेली आहे, अशी शेलकी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.