आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:21 PM2023-07-13T15:21:14+5:302023-07-13T15:22:12+5:30
जयंत पाटलांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न
Jayant Patil, Maharashtra Political Crisis | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडानंतर रोज नवनवीन बातम्या येत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील काही आमदार नव्याने अजित पवारांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असताना, आम्ही सारे आमदार शरद पवार यांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.
'शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे,' असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे सांगितले जात होते, पण जयंत पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नव्हता. या दरम्यान, सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून मी शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. शरद पवार यांच्यासोबत असणारे आम्ही सर्व आमदार अद्यापही साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केले आहे.
नक्की काय सुरू आहे चर्चा?
शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका जयंत पाटील घेत आहेत, तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता. मंत्रिमंडळात भाजपाचे 10 शिवसेनेचे 10 तर राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आहेत. जयंत पाटील यांना अजित पवार गटात आणण्यात यश आले, तर त्यांना मंत्रीपद दिल्यास तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 10 मंत्री असतील. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या होत्या. त्या वेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यात राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते. परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावाही अजित पवार गटाकडून केला जात आहे.