"इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते..."; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:23 PM2024-08-14T17:23:55+5:302024-08-14T17:26:17+5:30
बारामती लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांनी दिलेल्या कबुलीवरुन जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.
Jayant Patil On Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. बारामतीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावून देखील शेवटी सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता दोन महिन्यांनी अजित पवार यांनी पत्नीला निवडणुकीला उभे करायला नको होतं अशी कबुली देत आपली चूक मान्य केली. अजित पवार यांच्या कबुलीनंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवार यांची त्या विधानावरुन खिल्ली उडवली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी या निकालाबाबत एका वृत्तवाहिनी बोलताना भाष्य केलं. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उमेदवारी देऊन चूक केल्याची कबुली दिली आहे. बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यावरुनच आता जयंत पाटील यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. इव्हेंट मॅनेजर सांगतात तसं अजित पवार बोलतात असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. ते धाराशिवमध्ये बोलत होते.
"इव्हेंट मॅनेजरने सांगितले असेल की तुम्ही आता असे बोला कारण असं बोलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यांनी जर मी भाजपसोबत गेलो ही चूक झाली हे सांगितले तर विश्वास ठेवता येईल. पण एवढ्याश्या छोट्या विधानाने त्यांची भूमिका बदलली असं वाटत नाही. इव्हेंट मॅनेजरने जसं सांगतील तसे ते वागत आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
काय म्हणाले अजित पवार?
"सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं," अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे.