मुंबई - महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेनेवर आपल्या जुन्या मित्रपक्षाकडून दररोज टीका होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे.
हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले. काँग्रेसने कधी शिवसेनेला समोर उभं राहू दिले नाही. मात्र हिंदुत्वाचा विचार बाजुला ठेवून शिवसेना काँग्रेसला सामील झाली आहे. त्यामुळे जनतेत नाराजी असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमध्ये पीडीपीसोबत का गेला होता, असा सवाल राऊत यांनी भाजपला केला आहे.
शिवसेना-भाजप यांच्या हिंदुत्वाच्या वादात जयंत पाटील यांनी उडी घेत भाजप आणि नितीन गडकरी यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीत मंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी भाजपचं हिंदुत्व पुसलं गेलं आहे. गडकरींची व्याख्या अशी असेल तर भाजपला हिंदुत्वाचा पुरस्कार करता येणार नाही. किंबहुना हिंदु मतं भाजपच्या पारड्यात पडावी, यासाठी गडकरी यांचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्दावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेना आता हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकत नाही. तर शिवसेनेकडून भाजपने देशभरात केलेल्या विचित्र युत्यांविषयी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.