मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. सीतारमण यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं ठरलं आहे. तर सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, 'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प' अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
देशात आर्थिक मंदी असल्याने शनिवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाकडून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र देशवासीयांच्या अपेक्षा केंद्र सरकारने पार धुळीस मिळवल्या आहेत. कोणतीच ठोस तरतूद नसलेल्या या अर्थसंकल्पाला 'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प' असाच उल्लेख करावा लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.
तसेच, रस्त्याच्या कामांसाठी सरकारकडे पैसे नाहीत, तरीही मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही.अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखे काहीच नाही.करसवलतिच्या नावाखाली इन्कमटॅक्स स्लॅबमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. याने लोकांना फायदा होईल, असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.