सांगली: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यकष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटलांनी गृहमंत्रिपद नाकारल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार(Ajit Pawar) यांनी दिली होती. त्यावर आता स्वत: जयंत पाटील यांनी भाष्य करुन गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे.
अजित पावरांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात खुलासा केला होता. त्याची कबुली जयंत पाटलांनी दिली. अजित पवारांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही सांगितलं ते खरं आहे, असं ते म्हणाले. तसेच, यावेळी जयंत पाटलांनी आर.आर.पाटील(RR Patil) यांच्या समवेतील एक किस्साही सांगितला.
आरआर पाटलांना सुरू झाला त्रास...
सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं होतं. त्यावर आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आबांनी मला गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असं मिश्कीलपणे म्हटल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसेच, गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे मला आरआर(आबा) पाटील यांनी सांगितलं होतं. या कारणामुळेच मी गृहमंत्रिपद नाकारलं, असा खुलासा जयंत पाटलांनी केला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी कशा प्रकारे टाळली असा किस्सा सांगितला. गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं, त्यात जयंत पाटीलही होते. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो, आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं, असं जयंत पाटील म्हणाले असल्याची माहिती अजित पवारंनी दिली.