उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:18 PM2023-05-23T15:18:23+5:302023-05-23T15:22:23+5:30

Maharashtra Politics: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed | उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

googlenewsNext

Maharashtra Politics: इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची तब्बल साडेनऊ तास ईडी चौकशी झाली. महाविकास आघाडीतील नेत्यांनी या कारवाईवर टीका केली. तसेच भाजपवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांना साधा फोनही केला नसल्याचे समोर आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल सुरू नसून, पुन्हा एकदा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून विचारपूस केली. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आले होते. 

अजित पवारांनी फोन केला नाही!

जयंत पाटील यांना कोणाचे फोन आले, असे विचारण्यात आले. याला उत्तर देताना, अनेक जणांचे फोन आले. फोन आलेल्यापैकी कोणाचे नाव घेणार नाही. कारण काही नाव सुटून जाण्याची शक्यता आहे. यामुळे एखादे नाव राहिले तर चूक होईल. यामुळे कोणत्याही नेत्याचे नाव घेत नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. तर, अजित पवार यांचा फोन आला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, नाही, अजित पवार यांचा फोन आला नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षनेता निवडीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. यानंतर आता जयंत पाटील ईडी चौकशीसाठी हजर झाले, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा सांभाळला. दिवसभर ते त्याठिकाणी हजर होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

 

Web Title: jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.