विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 09:48 PM2023-07-17T21:48:17+5:302023-07-17T21:48:39+5:30

शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसचे आमदार पायरीवर आंदोलन करताना राष्ट्रवादी गैरहजर

Jayant Patil explains why NCP Sharad Pawar group MLAs were not present for protest in Maharashtra Monsoon Session | विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

googlenewsNext

Jayant Patil on Maharashtra Monsoon Session: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरूद्ध जोरदार आवाज उठवला आणि घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार होते. पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार दिसले नाहीत. यावरून अनेक गोष्टींची चर्चा रंगली. पण अखेर या चर्चांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचे जयंत पाटलांनीच कारण सांगितले.

"काल विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यावेळी आम्हाला वाय बी चव्हाण येथे बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बैठकीत काय ठरलं हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आज आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलावलं होतं. तेव्हा खाली पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे हे माहित नव्हतं, लक्षात आल्यानंतर आम्ही खाली आलो. त्यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते तेव्हा आम्ही तिथे जाऊन हार अर्पण केला. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उपस्थित राहू शकलो नाही, पण आम्ही विरोधातच आहोत. उद्या पायऱ्यांवरील आंदोलनात आम्हीही असणार आहोत," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

"जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून मार्ग दाखवावा अशी मागणी अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवारांना कोणी कधीही भेटू शकतं. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना पवार नाकारत नाहीत," असेही जयंत पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रतोद जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, "आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारांना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते ते नाराज होते का? याच्याशी काहीही संबंध नाही. पवारांनी आपली भूमिका येवला येथील सभेत अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारां साहेबांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे वाटत नाही. आम्ही सर्व एकच पक्ष आहोत. त्यामुळे काही लोकांनी पक्षविरोधी केलेली कृतीवर कारवाई म्हणून नोटीस बजावलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या आदेशानेच हे सर्व काम सुरू आहे. आम्ही विधीमंडळात विरोधी बाकावरच बसलेलो आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे."

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे. शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच बसले आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे. हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठकीची व्यवस्था बघितली तर सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आपण बघितले असेल. त्यामुळे शरद पवार साहेबांच्या भेटीला आमदार आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उद्भवणे योग्य नाही. कारण गेली अनेक वर्ष ज्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे तिच लोक पुन्हा शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतही कारण नाही," असे पाटील यांनी स्पष्ट केले.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलं आहे ते सर्वचजण शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. त्यातलेच काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे. पण तिच लोक आज शरद पवार साहेबांकडे  येऊन भेटले आणि यातून मार्ग काढा अशी शरद पवार साहेबांना त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे इतर कोणी अस्वस्थ होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शरद पवार साहेब हे देशातले अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन आमदारांनी विनंती केली की निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा," असे जयंत पाटील यांनी माहिती दिली.

विरोधकांची उद्याला होत असलेले बैठकी संदर्भात विचारण्यात आले. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला जातील त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

Web Title: Jayant Patil explains why NCP Sharad Pawar group MLAs were not present for protest in Maharashtra Monsoon Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.