मुंबई - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. मात्र दुसरीकडे राजकीय नेते पूरग्रस्तांना मदतीची सुद्धा जाहिरात करत असल्याचे समोर आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणक यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याची बातमी सर्वात आधी 'लोकमत'ने प्रसिध्द केली होती. त्यांनतर राष्ट्रवादीकडून हा फोटो खोटा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र जयंत पाटलांनी स्टीकर वापरल्याची कबुली दिल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नेते तोंडघशी पडले आहे.
सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून भाजपने जाहिरातबाजी केली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सुद्धा मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी स्व:ताच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे फोटो पोस्ट केली होती . मात्र 'लोकमत'वर बातमी प्रसिध्द होताच तो फोटो डिलीट करण्यात आला होता. तसेच हा फोटो खोटा असून फोटोशॉप वर बनवण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला होता .
एकीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल हा फोटो खोटा असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे खुद्द जयंत पाटील यांनी यांनी खाद्यपदार्थांसाठी आधीच छापलेले जुने बॉक्स वापरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी अधिकृतरीत्या ट्विट करत ही माहिती दिली आहे. पाटील यांच्या कबुलीनंतर मात्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल तोंडघशी पडले असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र राजकीय नेते आपल्या मदतीतून सुद्धा स्व:ताची जाहिरातबाजी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला सोशल मिडीयावर नेटकरी ट्रोल करत असल्याचे पहायला मिळत आहे.