मुंबई - मागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांला अर्ज करून ही शेततळाच्या लाभ मिळत नसेल तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या योजनेचे नाव बदलून 'जमेल त्याला शेततळे' असे केले पाहिजे असल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या ठराववर ते बोलत होते.
भाजप सरकार फसवे आहे. 'मागेल त्याला शेततळे' अशी घोषणाबाजी करून सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने दावा केला आहे की, ६२ हजार शेततळे बनवली गेली आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख ८२ हजार अर्ज सरकारकडे आलेली आहेत. त्यातील लाखभर शेतकऱ्यांना सुद्धा शेततळी मिळाली नसतील तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.
भाजप सरकारच्या शेततळे योजनेचे नाव , 'मागले त्याला शेततळे' एवजी 'जमेल त्याला शेततळे' किंवा 'आमच असेल त्याला शेततळे' ठेवले पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेतून शेततळे होत नाही. त्यामुळे ५० हजार रुपये वाढवून देण्याची मागणी केली असताना सरकारने त्याकडे दुर्लक्षित केले असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
यावेळी त्यांनी, राज्यपालांचे अभिभाषण मान्य नसून त्याला आम्ही विरोध करत असल्याचे म्हणाले. गेल्या पाचवर्षातील राज्यपालांचे भाषण म्हणजे सरकारच इरादापत्र असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. आम्ही काय करणार या पेक्षा, आम्ही काय केलं असे राज्यपाल यावेळी आपल्या भाषणातून सांगतील अशी अपेक्षा होती. पण यावेळी देखील तिचं टिमकी वाजवली असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला.